केपी शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी
बातमी विदेश

केपी शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

नेपाळ : नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना तीन दिवसापूर्वी संसदेत विश्वासदर्शक ठराव गमावला होता. मात्र तरीही ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. विरोधी पक्षांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्याने केपी शर्मा ओली यांची पुन्हा एका पंतप्रधानपदी वर्णी लागणी आहे. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी सीपीएन यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विरोधी पक्षांना बहुमत सिद्ध करत नवं सरकार स्थापन करण्यासाठी गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला होता. मात्र नियोजित वेळेत विरोधी पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे ओली यांना पुन्हा एकदा सरकार स्थापनेची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यांनाही ३० दिवसाच्या आत विश्वादर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.

नेपाळमधील परिस्थिती काय आहे?
नेपाळच्या संसदेत एकूण २७१ खासदार आहेत. त्यापैकी ओलींच्या पक्षाकडे १२१ जागा आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १३६ जागांची आवश्यकता आहे. तीन दिवसापूर्वी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी ओली यांना फक्त ९३ मतं पडली होती. त्यांना कमीत कमी १३६ मतांची आवश्यकता होती. विश्वासदर्शक ठरावाविरोधात १२४ मतं पडली होती. १५ खासदार तटस्थ होते. तर ३५ खासदार मतदानावेळी गैरहजर होते. त्यामुळे त्यांचं पंतप्रधानपद गेलं होतं.