धोकादायक! राज्यातील या तालुक्यात कोरोनामुळे पुन्हा कडक लॉकडाउन
उत्तर महाराष्ट् बातमी

धोकादायक! राज्यातील या तालुक्यात कोरोनामुळे पुन्हा कडक लॉकडाउन

नगर : नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली. त्यांच्या आदेशानुसार रुग्णसंख्या जास्त असलेल्या बारा गावांत पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या दिलासादायक बातम्या येत असताना पारनेरकरांना मात्र पुन्हा लॉकडाउनला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज, कान्हुर पठार, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव, रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तीन ऑक्टोबरपर्यंत या गावांतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

नगर दौऱ्यावर आलेल्या डॉ. गमे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, नायब तहसीलदार गणेश अधारी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लांडगे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप उपस्थित होते. विभागीय आयुक्त गमे यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व कान्हुर पठार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. करोनाच्या संभाव्य तिसरा लाटेच्या पार्श्वभूमीवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर सुरु करण्याचे सूचना त्यांनी केल्या. पारनेर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचा मतदारसंघ असून त्यांनी उभारलेल्या कोविड सेंटरची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.