तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर
बातमी विदर्भ

तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर

अकोला : अति घाईमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासामध्ये आपला जीव गमावला आहे. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, असो वा खाली उतरण्याचा प्रयत्न… दरम्यान, काल अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत असाच एक प्रकार घडला. मात्र रेल्वे पोलिसाच्या समसूचकतेमुळे तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही प्रवासी महिला चालत्या रेल्वेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करीत होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अकोला स्थानकावर ड्युटीवर असताना आरपीएफच्या बी.आर. धुर्वे या पोलिसाला, चालू रेल्वेमधून प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी महिला पडताना दिसली. त्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली अन् वेळेत महिला प्रवाशाला रेल्वेच्या बाजूला केले. या समसूचकतेमुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला. धुर्वे यांच्या या धाडसी कृत्याचं सध्या सर्वत्र कौतूक केलं जातं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?

काल रात्री रेल्वे क्रमांक- १७६४१ काचीगुडा एक्सप्रेस अकोला स्थानकावरुन रवाना होत असताना, एक प्रवासी महिला धावत्या ट्रेन मधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यावेळी तिचा तोल गेल्याने ती रेल्वेच्या दारातून खाली रेल्वे जवळ पडली. बाजूला रेल्वेच्या पायऱ्यावरून खाली उतरत असलेल्या रेल्वे पोलिसाच्या कर्मचाऱ्याला ही महिला खाली पडताना निदर्शनास आली. त्यांनी लागलीच तिच्याकडे धाव घेतली आणि त्या प्रवासी महिलेला रेल्वेपासून बाजूला केलं. हा सर्व प्रकार अकोल्याच्या स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.