महावितरणमुळे टिकटॉक स्टार संतोष मुंडेला गमावलं, कुटुंबाचा आरोप, गाव धाय मोकलून रडलं
बातमी मराठवाडा

महावितरणमुळे टिकटॉक स्टार संतोष मुंडेला गमावलं, कुटुंबाचा आरोप, गाव धाय मोकलून रडलं

बीड :टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा विजेच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू झाला. विद्युत रोहित्राला फ्युज लावत असताना अचानक लाईट आल्याने शॉक लागून संतोषसह आणखी एकाला प्राण गमवावे लागले. याला विद्युत महामंडळाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप संतोष मुंडेचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जोपर्यंत विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय भोगलवाडी गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र यामध्ये विद्युत महामंडळाचे मुख्याधिकारी आणि गावातील काही मोठ्या व्यक्तींनी एकत्र येऊन याविषयी एक निर्णय घेतला. त्यानंतर अखेर संतोष मुंडे आणि त्याच्या मित्राचे अंत्यविधी करण्यात आले.

या गावाची परिस्थिती पाहायला गेलं, तर विद्युत महामंडळाचा अनागोंदी कारभार पाहायला मिळतो. रस्त्याच्या मधोमध असलेले रोहित्र लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या गोष्टीकडे विद्युत महामंडळाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी या वेळेस दिला आहे.

संतोष मुंडे हा tiktok स्टार असल्याने रात्रीतच बीडसह महाराष्ट्रभरातून त्याचे अनेक चाहत, टिकटॉक स्टार आणि मित्र-नातेवाईक गावात आल्याने सगळ्यांनी मिळून लवकर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

संतोष मुंडे सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्तिमत्त्व होतं. काही काळापूर्वी संतोष मुंडेने सहज एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला. मात्र त्यातील गावरान लहेजा आणि बोलीभाषेने तो व्हिडिओ बघता बघता टिकटॉक वर गाजत गेला. याच व्हिडिओमुळे संतोषला एक वेगळी ओळख मिळत गेली. या ओळखीमुळेच संतोष रातोरात टिकटॉक स्टार झाला आणि जवळपास महाराष्ट्रभरातून संतोषला भेटण्यासाठी अनेक tiktok स्टार आणि चाहतेही त्याच्या घरी येत असल्याचं गावकरी सांगतात.

त्याचे असे अनेक व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाले, मात्र काही काळानंतर टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामला देखील संतोष तितकाच गाजत राहिला. लाखोंचे फॉलोवर्स, त्यानंतर युट्यूब आणि फेसबुकवरही संतोषचे अनेक व्हिडिओ चाहत्यांनी फॉलो केले, मात्र त्याच्या अकाली जाण्याने अनेक tiktok स्टार हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळतात. मात्र त्याच्या निधनानंतर महावितरण कंपनी या गावच्या लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करणार का? हा देखील प्रश्न यापुढे उभा राहत आहे.