महाराष्ट्राने केली केंद्राकडे अधिकच्या एवढ्या लसींची मागणी
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्राने केली केंद्राकडे अधिकच्या एवढ्या लसींची मागणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात महाराष्ट्राला १ कोटी १५ लाख लसींचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रात आतापर्यंत तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा केल्यास राज्यातील लसीकरण नियोजित वेळेत पूर्ण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात देशभरात १२ कोटी लस डोस वितरण होणार असून त्यापैकी १ कोटी १५ लाख डोसेस महाराष्ट्राला दिले जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात जुलै महिन्यात रोज सरासरी ३ लाख ७० हजार लोकांचे लसीकरण होऊ शकते. आरोग्य विभागाने रोज १० ते १२ लाख लोकांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे व आवश्यकतेनुसार १५ लाख लोकांना रोज लस देता येईल असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही अन्य राज्याच्या तुलनेत अत्यल्प आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी २ जुलै रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहून महाराष्ट्राला दीड कोटी जादा लसीचे डोस देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राची १२ कोटी लोकसंख्या लक्षात घेता २४ कोटी डोसची गरज असून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ३ कोटी ३० लाख एवढी आहे. केंद्राकडून वेळेत लस पुरवठा होत नसल्याने गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागातील लस केंद्र बंद करावी लागली होती. अशावेळी लोकांची लसीकरणासाठी भटकंती होऊन त्यांचा रोष राज्य सरकारला सहन करावा लागतो. मात्र केंद्राने लस पुरवठ्याची स्वतः ची जबाबदारी झटकत राज्यांनी योग्य नियोजन करावे असा सल्ला देत लस समस्येला राज्य सरकारेच जबाबदार असल्याची टीका केली आहे.