अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी, गडचिरोलीतील तीन हत्ती गुप्तपणे गुजरातला पाठवले
बातमी विदर्भ

अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी, गडचिरोलीतील तीन हत्ती गुप्तपणे गुजरातला पाठवले

गडचिरोली : आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या पातानिल जंगलातील तीन हत्ती २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गुजरातमधील जामनगर येथे रवाना झाले. या हत्तींना जामनगर येथील ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ या संस्थेमध्ये ठेवण्यात येणार आहे. गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय होत आहे. हे संग्रहालय रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. गडचिरोलीतील तीन हत्ती यासाठीच रवाना झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या अगोदरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील १३ हत्तींचे स्थानांतरण करण्याचे आदेश वनविभागाला आले होते. २० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील चार नर व दोन मादी असे एकूण सहा हत्ती गुजरात येथील जामनगरला पाठविण्यात आले. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातून हत्तींच्या स्थलांतराला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. अखेर तीन महिन्यानंतर १ सप्टेंबरच्या मध्यरात्री गोपनीयता बाळगून प्रक्रिया पूर्ण करत आलापल्ली वन विभागातील पातानिल जंगलातील तीन हत्तींना २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बंदिस्त वाहनातून रवाना करण्यात आले.

गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय होत आहे. हे संग्रहालय रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १३ हत्ती या ठिकाणी पाठवायचे निर्देश वन विभागाला यापूर्वीच मिळाले होते. त्या अनुषंगाने चंद्रपूर येथील ताडोबातील सहा आणि आलापल्ली येथील पातानिल जंगलातील ३ असे ९ हत्ती रवाना झाले असून आता कमलापूर येथील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प मधून ४ हत्ती रवाना करायचे आहे.

नुकतेच काही वरिष्ठ अधिकारी कमलापूर येथील शासकीय हत्ती कॅम्पला भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच कमलापूर शासकीय हत्तीकॅम्प मधूनही हत्ती गुजरात येथील जामनगरला रवाना होणार असल्याची चर्चा आहे.

दोन नर तर एक मादीचा हत्तीचा समावेश

1962 साली घनदाट जंगलातून सागवान लाकडांचे ओंडके ओढण्यासाठी आलापल्ली वन विभागात काही हत्ती आणण्यात आले होते. त्यावेळी विविध वनपरिक्षेत्रात या हत्तींना कामासाठी ठेवण्यात आले होते. काही हत्ती पातानिल जंगलात होते. त्यातील जयलक्ष्मी आणि जगदीश हे गुजरातसाठी रवाना झाले आहे. सोबत विजय नावाच्या नर हत्तीला सुद्धा रवाना करण्यात आले असून सदर हत्ती २००९ मध्ये सावंतवाडी जंगलातून आणले असून तेव्हा तो जवळपास ७ ते ८ वर्षाचा होता. असे जाणकार सांगतात.

रवाना करण्याचे होते आदेश

पातानिल जंगलातील तीन हत्तींना रवाना करण्याचे वरिष्ठांचे आदेश होते. त्यामुळे ओल्ड एज हत्तींना रवाना करण्यात आले, अशी माहिती आलापल्ली वन विभागाचे उपवनसंवरक्षक राहुलसिंह तोलिया यांनी दिली.