राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव वगळले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करण्यावर राजीव गांधी यांनी भर दिला होता. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम व समाजाच्या सर्वागीण विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) या पुरस्कारासाठी संस्था प्रस्तावित करेल. या वर्षी राजीव गांधी यांच्या जयंतीला म्हणजे २० ऑगस्टला पुरस्काराची घोषणा केली जाईल. तर पुरस्कार ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रदान केला जाईल. पुढील वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्टला पुरस्कार प्रदान केला जाईल.

मोदी सरकारने खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधी यांचे नाव वगळल्याने राज्यातील पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला. माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव देऊन काँग्रेसने भाजपवर कुरघोडी केली. आतापर्यंत राजीव गांधी जयंती ही माहिती तंत्रज्ञान दिन म्हणून साजरी केली जात होती. यापुढे त्यांच्या नावे पुरस्कार दिला जाणार आहे.