महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा
बातमी महाराष्ट्र

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा

ठाणे : अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.

“महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, रचणार आहेत. मी जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हाही एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा पुरुषार्थ आहे त्यांच्यात, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा” असं रामदेव बाबा म्हणाले.

माझ्यात आणि बाळकृष्ण यांच्यात कधी वाद होतो, कधी ते वेगळे होतायेत याकडे अनेक लक्ष लावून आहेत, पण तसं काही होणार नाही असंच राज्यात सुरु असल्याचं मिश्किल भाष्यही रामदेव बाबांनी केलं.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव केली. “मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जवळून ओळखते, त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम आहे, ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत, मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो, मात्र त्यांचे मराठी भाषेवर प्रेम आहे, मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत” अशा शब्दात अमृता फडणवीसांनी कोश्यारींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.

याआधीही रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. शिंदे हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी भेट घेतली. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचं आत्मीय प्रेम होतं. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मोठ्या विषयांवर गप्पा मारल्या. खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर व्यक्त केली होती.