बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आजचा आकडा आहे एवढा, तर मृत्यूंची संख्या १७३

मुंबई : मागील २४ तासांत महाराष्ट्रात एकूण ७ हजार ८२७ नवे कोरोना रुग्ण आढळले तर १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहचली आहे. तर, १० हजार २८९ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अशातच एक दिलासादायक बातमी असून राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या आता दीड लाखाच्या उंबरठ्यावर आली आहे. राज्यात आज ३ हजार ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून, आतापर्यंत राज्यात १ लाख ४० हजार ३२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच असला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात २४ तासांत २८ हजार ६३७ नव्या करोना रुग्णांची भर पडली आहे. तर ५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख ४९ हजार ५५३ इतकी झाली आहे. ५ लाख ३४ हजार ६२१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर २ लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.