सोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका; जिंकला सर्वोत्तम पुरस्कार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका; जिंकला सर्वोत्तम पुरस्कार

सोलापूर : सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात आपला डंका वाजवला असून युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी निवड होणारे ते पहिले भारतिय शिक्षक आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातून प्राथमिक फेरीसाठी पन्नास, तर अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील दहा शिक्षकांना नामांकने जाहीर झाली होती.

पुरस्काराचे स्वरुप
एक दशलक्ष अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार आहे. भारतीय चलनाप्रमाणे ते ७ कोटी रुपये होतात. डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य नऊ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले. यामुळे या नऊ देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी मदत होईल, असा आशावाद डिसले यांनी व्यक्त केला आहे. तर उर्वरित रक्कम टीचर इनोव्हेशन फंडसाठी वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. पुरस्काराच्या इतिहासात एखाद्या विजेत्याने मिळालेल्या पुरस्काराची काही रक्कम अंतिम फेरीतील अन्य मानांकितांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

डिसले यांचे कार्य काय?
डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना क्यूआर कोडची जोड देऊन शिक्षणात डिजिटल क्रांती करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगाने केवळ महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली. तब्बल ८३ देशांतील विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन माध्यमाद्वारे विज्ञान शिकवतात.