निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे
बातमी महाराष्ट्र

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे

मुंबई : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय वाणिज्य उत्सव या परिषदेचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. येथील प्रदर्शन दालनांचे यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, विदेश व्यापार महानिदेशालयाचे अतिरिक्त महासंचालक एस बी एस रेड्डी, जेम्स ॲण्ड ज्वेलरी निर्यात परिषदेचे अध्यक्ष संजय शाह, जागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

परिषदेतून महत्त्वाच्या सूचना अपेक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत होणाऱ्या चर्चासत्रांच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना येतील त्यांचे स्वागत केले जाईल असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिषदेसाठी दिला. मुख्यमंत्र्यांनी लिखित स्वरुपात पाठविलेल्या संदेशाचे वाचन अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग यांनी केले. अशा प्रकारच्या परिषदेच्या माध्यमातून नविन संकल्पना पुढे येतात, अनेक उद्योजकांना नवे मार्ग शोधता येतात त्यामुळे अशा परिषदांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

चारशे मिलीयन डॉलर निर्यातीचे लक्ष्य- उद्योगमंत्री देसाई
देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 25 टक्के आहे. केंद्र शासनाने भारतातून सुमारे चारशे मिलीयन डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनातही १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार – अदिती तटकरे
कोविड परिस्थितीत आरोग्य विभागाच्या बरोबरीने उद्योग विभागाने काम करुन प्रतिकूल परिस्थितीतही राज्याचे अर्थचक्र सुरळीत सुरु ठेवण्याची महत्त्चाची कामगिरी बजावली आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळातही एक लाख 30 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार राज्यात झाले आहेत. असे गौरवोद्गार उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काढले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, विदेश व्यापार महानिदेशालयाचे अतिरिक्त महासंचालक एस बी एस रेड्डी, जेम्स ॲण्ड ज्वेलरी निर्यात परिषदेचे अध्यक्ष संजय शाह, जागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री यांचीही भाषणे झाली.

जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबविणार – डॉ. हर्षदीप कांबळे
उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावे यासाठी उद्योग संचालनालयाद्वारे या महाएक्स्पो कॉन्क्लेव्हची आखणी वाणिज्य सप्ताहमध्ये करण्यात आली असून प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे उद्योग विभागाचे आयुक्त तथा राज्याचे निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून जिल्हा निहाय निर्यात आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.