दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी घटली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी घटली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कaरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत होती. मात्र एक दिलासादायक वृत्त असून मागील दोन दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शनिवारच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण पाहायला मिळाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यानंतर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख २० हजार ०५९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १६ लाख ८० हजार ९२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ९० हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ हजार ०७१ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात नव्या रुग्णसंख्यावाढीत किंचितशी घट झाल्याचे दिसत असले तरी करोनाचे संकट टळलेले नाही. महाराष्ट्र सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशातील राज्यांपैकी एक आहे. दिवाळीनंतर दिल्लीत करोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रातही विशेष काळजी घेतली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्राने दिल्ली गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना करोनाची चाचणी करूनच येण्याची सक्ती केले आहे. राज्यातील विमानतळे आणि रेल्वे स्थानकांमध्येही प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे.