मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी राडा; EWSबाबतच्या निर्णयानंतर मराठा मोर्च्याचे कार्यकर्ते आक्रमक
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी राडा; EWSबाबतच्या निर्णयानंतर मराठा मोर्च्याचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात आलेल्या विविध पदांवरील उमेदवारांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार होते. मात्र मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. कारण आजच मुंबई हायकोर्टाने सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोर्टाकडून १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती देण्यात आली असताना इतर विद्यार्थ्यांना असे नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी मराठा आंदोलनकर्ते आबासाहेब पाटील यांनी केली. तसंच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही आबासाहेब पाटलांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेतलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ११४३ जागा भरण्यात आल्या. त्यापैकी १११ असे उमेदवार आहेत, ज्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली. याबाबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही राज्य सरकारकडे एक विनंती केली आहे. ‘उच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे की, ११४३ पैकी १११ विद्यार्थ्यांना तात्पुरत्या नियुक्त देऊ नका. उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये सर्वच समाजाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. तसेच मराठा समाजाचे सुद्धा आहेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, ज्या पद्धतीने आपण Super Numery चा कायदा केला होता, त्याच पद्धतीने आपण कायद्यात तरतूद करून या पात्र असणाऱ्या १११ विद्यार्थ्यांना समाविष्ट करावे व त्यांना न्याय द्यावा. कारण त्यांनी सर्वच प्रकारच्या परीक्षा देऊन अडचणींचा सामना करून यश संपादन केले आहे,’ असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.