ट्रक आणि टेम्पोला भीषण अपघात: ५ जणांचा जागीच मृत्यू, इतर ५ गंभीर; वाहनांचा चक्काचूर
बातमी मराठवाडा

ट्रक आणि टेम्पोला भीषण अपघात: ५ जणांचा जागीच मृत्यू, इतर ५ गंभीर; वाहनांचा चक्काचूर

नांदेड : नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये मूळचे बिहारमधील असलेल्या ४ मजुरांसह एका ट्रक चालकाचा समावेश आहे. तसंच या अपघातात इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशर टेम्पोच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बिहार येथून उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आलेले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शहरात सध्या रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. दिवसभर हिमायतनगर परिसरात काम करून हे मजूर परत टेम्पोमधून विद्युत लाईनचे साहित्य घेऊन भोकर येथे जात होते. या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे आयशर टेम्पोला (वाहन क्रमांक एमएच -२६ जे ००१६) भरधाव वेगातील सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच- २६ बीई १०११) जबर धडक दिली.

या अपघातात ५ मजुरांवर काळाने घाला घातला आहे, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना सोनारी येथील युवकांनी बाहेर काढून सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. वाहनांना वेग मर्यादा नसल्याने वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर, वाहनांना वेग मर्यादा लावणे तसंच मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी करणं गरजेचं आहे, अशी मागणी अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी केली आहे.