हवामान विभागाचा इशारा; कोकणासह पुणे, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता
बातमी महाराष्ट्र

हवामान विभागाचा इशारा; कोकणासह पुणे, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पुढील काही वेळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत रविवारी अ‍ॅलर्ट जारी केला होता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचा सोमवारी मात्र जोर वाढलेला दिसला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्याने २० दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारपासून पुढील ५ दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यात रविवार दुपारपासूनच पावसाने जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्याने प्रमुख नद्यांमध्ये पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.