म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; यापुढे…
बातमी मुंबई

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; यापुढे…

ठाणे : १२ डिसेंबर रोजी म्हाडाची परीक्षा पार पडणार होती. (MHADA recruitment exam) परंतु अपरिहार्य कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आली होती. याची माहिती काल रात्री उशिरा राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली होती. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही परीक्षा म्हाडा स्वतः घेणार असल्याची घोषणा केली. तसेच परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांकडून आकारलेले संपूर्ण शुल्क परत करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी आव्हाड यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज होणारी म्हाडाची परीक्षा ( MHADA exam) ही अपरिहार्य कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आली होती. खासगी संस्थांच्या माध्यमातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या दरम्यान गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढत चालले होते. पेपर फुटल्याची माहिती देखील म्हाडाला मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात देखील घेतले. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये परिक्षार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या देखील घटना घडल्या होत्या. या सगळ्या बाबींना रोख बसण्यासाठी म्हाडाला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला असून या पुढील परीक्षा ही म्हाडा स्वतः घेणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले. यामध्ये परिक्षार्थ्यांना त्रास देखील सहन करावा लागला. परंतु परिक्षार्थ्यांकडून परीक्षेसाठी आकारलेले शुल्क हे म्हाडाकडून परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढे म्हाडातर्फे होणाऱ्या परीक्षेसाठी कुठलीही फी आकारली जाणार नसल्याचे देखील आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांनी सांगितले की, प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना पहिली नसून याआधी देखील आरोग्य खात्याच्या परिक्षेदरम्यान पेपर फुटले होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ज्या तीन जणांना ताब्यात घेतले त्या तीन जणांमधील दोन जण हे आरोग्य खात्याच्या पेपर फुटीत सामील होते. या प्रकरणात ज्यांना म्हाडाच्या पेपरचे काम दिले होते, त्यांचा मालक सापडला. त्यांच्या लॅपटॉपमध्ये प्रश्नपत्रिका आढळल्याचे आव्हाड यांनी सांगितले. मी एकमेव असा मंत्री आहे की जो तीन दिवस सतत परिक्षार्थ्यांच्या संपर्कात होतो. दुसरा कुठलाही मंत्री हे करणार नाही. परीक्षा होण्याआधी पोलिसांना मी विनंती केली होती आणि पोलिसांनी करून दाखवलं. सरकार आहे म्हणून हे झाले. परीक्षार्थींना न्याय मिळायला पाहिजे. हे ‘वशिल्यातले टट्टू’ मंत्रालयात जातात. त्याच्यानंतर भ्रष्टाचार वाढत जातो. त्याला रोखण्याचा काम आम्ही केले असल्याचे आव्हाड म्हणाले.