सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना आमदाराला सहा महिन्यांची शिक्षा
बातमी मराठवाडा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना आमदाराला सहा महिन्यांची शिक्षा

औरंगाबाद : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी औरंगाबादचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये २० मे २०१८च्या मध्यरात्री झालेल्या जातीय दंगली प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील खुर्च्या, काचांची मोडतोड करून पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जैस्वाल यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विविध गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिन्याची शिक्षा असली तरी ती एकत्रच भोगावयाची आहे. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्या. एस. एम. भोसले यांनी शिक्षेचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार चंद्रकांत निवृत्ती पोटे यांनी फिर्याद दिली होती.

सहा महिन्यांच्या शिक्षेसोबतच ५ हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठवला आहे. कलम ३५३ नुसार सहा महिने कारावास आणि २५०० रुपये दंड, किंवा दंड न भरल्यास एक महिना शिक्षा ठोठवली गेली आहे. तसेच, कलम ५०६ नुसार सहा महिने कारावास व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून ए. एस. देशपांडे यांनी कामकाज पाहिले.