देश बातमी

नकारात्मक कारणांसाठी सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश

नवी दिल्ली : अमेरिकेमधील टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या २०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र मोदींचा समावेश हा नकारात्मक कारणांसाठी करण्यात आला आहे. मोदींचा उल्लेख या यादीमध्ये ज्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे तो उल्लेख मान वाढवणारा नसून देशाच्या प्रतिमेसंदर्भात शंका घेणारा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्ती या यादीमध्ये उल्लेख भारताला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटणारे आणि हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलणारे नेते असा करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील राजवटीमध्ये भारतामधील मुस्लिमांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यात आली असा आरोपही या लेखात करण्यात आला आहे. भारतीय वंशाचे पत्रकार फरीद झकरिया यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचा आढावा घेणार लेख लिहिला आहे. यामध्ये ते लिहितात, पंतप्रधान मोदींनी पत्रकारांना घाबरवलं, धमकावलं आणि तुरुंगांमध्ये टाकलं. त्यांना असे कायदे आणले ज्यामुळे भारतामधील हजारो बिगर सरकारी संस्था आणि गट कमकुवत झाले.

झकरिया यांनी जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर भारतासाठी पंतप्रधान मोदी हे सर्वात महत्वाचे नेते आहेत असं म्हटलं आहे. या दोघांनंतर सर्वाधिक प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदीच आहेत, असाही उल्लेख या लेखामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यापूर्वीही टाइमच्या या यादीत समावेश करण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अन्य दोन भारतीय व्यक्तींचा या यादीत समावेश असून त्यांचा उल्लेख सकारात्मक पद्धतीने करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि कोव्हिशिल्ड ही कोरोनारोधक लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांचाही १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश आहे.