माकडांच्या भितीने भाजपनेत्याच्या पत्नीची दुसऱ्या मजल्यावरुन उडी; जागीच मृत्यू
देश बातमी

माकडांच्या भितीने भाजपनेत्याच्या पत्नीची दुसऱ्या मजल्यावरुन उडी; जागीच मृत्यू

शामली : माकडांपासून वाचण्याच्या नादात उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैरानामधील भाजप नेत्याच्या पत्नीचा दूर्देवी मृत्यू झालाय. घरातील काहीतरी काम असल्याने भाजप नेत्याची पत्नी घराच्या गच्चीवर गेली होती. मात्र, त्याच वेळेस आजूबाजूच्या झाडांवरुन माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. माकडांपासून वाचण्यासाठी या महिलेने थेट दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला. लोकप्रतिनिधीच्या पत्नीचाच माकडांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कैराना येथील भाजपाचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकुम सिंह यांचे भाचे तसेच वरिष्ठ भाजपनेते अनिल चौहान यांच्या पत्नीसोबत हा प्रकार घडला. सुषमा देवी असं अनिल चौहान यांच्या पत्नीचं नाव आहे. सुषमा या ५० वर्षांच्या होत्या. मंदिरामधून पुजा करुन आल्यानंतर सुषमा देवी घरातील काही कामासाठी गच्चीवर गेलेल्या त्याचवेळेस माकडांच्या एका टोळीने त्यांच्यावर हल्ला केला.

माकडांपासून वाचण्यासाठी त्यांनी गच्चीवरुन खाली उडी मारली. आरडाओरड आणि गोंधळ ऐकल्यानंतर घरातील व्यक्ती बाहेर आल्या तेव्हा त्यांना सुषमा या अंगणामध्ये पडलेल्या आढळून आल्या. सुषमा यांना तातडीने शामली येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृतावस्थेत आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं, न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.