एमपीएससी पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!
बातमी महाराष्ट्र

एमपीएससी पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई : आज (ता. ११) दिवसभर एमपीएसीची परिक्षा रद्द झाल्याबद्दल विद्यार्थी आंदोलन करत होते, त्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एमपीएसची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का असेना, पण दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा होतील हे वचन देतो, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.

एमपीएससीची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भिती वाटू लागली आहे. त्यानंतर परीक्षा देताच येणार नाही, याची देखील चिंता विद्यार्थ्यांना आहे. मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच परीक्षेच्या कामांची जबाबदारी दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.