कोकण बातमी

ट्विटरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

मुंबई : मुंबईत मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस चालू आहे. अशात रस्त्यावर पडणारी झाडं, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून पावसातही कर्तव्यभान राखलं जात असलं तरी अशातच पाऊस सुरू झाल्यानंतर ट्विटर इंडियानं एक प्रश्न विचारला होता त्यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट उत्तर देत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

झालं काय?
मागील काही दिवसांपासून मुंबई पोलीस कोरोनाबरोबरच पावसामुळे मुंबईकरांना होणारा त्रास टाळण्यासाठी भर पावसात कर्तव्य बजावताना दिसत आहे. अशातच ट्विटर इंडियानं पाऊस सुरू झाल्यानंतर एक ट्विट केलं. पाऊस पडतोय तुम्ही कोठे आहात? असा प्रश्न विचारला होता. त्याला मुंबई पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं. कफ परेड येथे ऑन ड्यूटी आहे. कामाप्रती निष्ठा हीच मुंबई पोलीसांची प्रतिष्ठा…. असं कडक उत्तर दिलं.

यापूर्वीही अनेकदा मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर खात्यावरून असे भन्नाट ट्विट केलेले पाहायला मिळत असतात. त्यात आज केलेले ट्विट नेटकऱ्यांना आणखीनच भावून टाकणारे होते. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरून मदतीबरोबरच जनजागृती करणारे ट्विट केले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कामाचं कौतुकही केलं जातं. कोरोनामुळे मुंबई पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा ताण वाढला आहे. त्यातही मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठी असल्यानं पोलिसांना गर्दी टाळण्यासाठी कडा पहारा द्यावा लागत आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांची मनं जिंकून घेतली. त्यावर एका नेटकऱ्यांनं मुंबईकर म्हणून अभिमान आहेच. पण, शूर व मदत करणारे पोलीस बघून आणखी गौरवास्पद वाटतं. शूर पोलीस सोबत असल्यामुळे आम्हा मुंबईकरांना काळजी नसते, म्हटलं आहे.