महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम करण्यास राज्य शासनानं केली मनाई
बातमी मुंबई

महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम करण्यास राज्य शासनानं केली मनाई

मुंबई: येत्या ६ डिसेंबर, अर्थात महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदाही मुंबईवर करोनाचे सावट असल्याने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी देखील गर्दी न करता बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेते आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य सरकारने यंदाच्या ६ डिसेंबर, या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल्स लावता येणार नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना आपापल्या घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहनही राज्य शासनानेही केले आहे. तसेच चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकात आदरांजली वाहण्यासाठी येणारे नेतेमंडळी आणि मान्यवरांनीही लशीचे दोन डोस घेतलेले असावे असे बंधनकारक करण्यात आले आहे. जर जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

काय आहे राज्य सरकारची नियमावली?

1. यावर्षी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 06 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे.

2. कोविड 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्रमांक ” ब्रेक द चेन ” अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

3 . महापरिनिर्वाण दिन हा परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे . त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे .

4. शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी , दादर , मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी , दादर , मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्ती परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील.

5. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत . तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा , धरणे , निदर्शने , आंदोलने व मोर्चे काढू नयेत.

6 . महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक / जिल्हा प्रशासनाने कोविड 19 च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत.

7. कोविड 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग , मदत व पुनर्वसन विभाग , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरुन आणखी काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.