अखेर राज्य सरकारचं नमलं! उजनीच्या पाण्याबाबतचा तो निर्णय रद्द
पश्चिम महाराष्ट्र बातमी

अखेर राज्य सरकारचं नमलं! उजनीच्या पाण्याबाबतचा तो निर्णय रद्द

बारामती : गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या पाण्यावर वाद पेटला होता. अखेर आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे राज्य सरकार नमले असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढलेला तो आदेश लेखी रद्द करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी 18 मे रोजी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला देणार नाही. तसा या पूर्वी काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे तोंडी सांगितले होते. परंतु, जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही. तोपर्यंत आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. अखेर आज उपसचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या आठवड्याभरापासून सोलापूरमध्ये आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाची धग बारामतीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उजनी पाणी प्रश्न घेऊन शेतकरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दारात बसले होते. उजनी धरणातून बारामती आणि इंदापूर जिल्ह्याला पाणी देण्यास विरोध करत उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते इस्लामपूर याठिकाणी मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते.

यावेळी पोलिसांनी कारखान्यावर थांबवून ठेवले. पोलिसांनी मज्जाव केल्याने यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तर याची दखल घेत पाटील यांनी त्वरित हा आदेश रद्द करण्यात आला आहे असं स्पष्ट केलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.