Foreign Scholarships : परदेशी शिष्यवृत्ती घेण्यात नागपूर आघाडीवर
बातमी विदर्भ

Foreign Scholarships : परदेशी शिष्यवृत्ती घेण्यात नागपूर आघाडीवर

परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाद्वारे दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळविण्यात नागपूर विभागातील विद्यार्थी आघाडीवर आहेत. राज्यातून निवड झालेल्या ७५ विद्यार्थ्यांपैकी एकट्या नागपूर विभागातून ३८ विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दरवर्षी अनुसुचित जाती आणि नवबौद्ध घटकातील ७५ विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाते. योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३८ विद्यार्थी नागपूर विभागातील असून त्यात ३१ विद्यार्थी नागपूर, ६ विद्यार्थी चंद्रपूर, तर १ विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील आहे. मुंबई विभागातून १६, पुणे येथून १२, लातूरमधून ३, तर औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक विभागातून प्रत्येकी २ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. जगातील टॉप ३०० विद्यापीठांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात असला; तरी यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांची निवड जगातील टॉप-५० विद्यापीठात झालेली आहे.

ब्रिटिश विद्यापीठांना पसंती
शासनातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ब्रिटिश विद्यापीठांना पसंती दिलेली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या ४४पैकी १७ विद्यार्थी ब्रिटन, १३ विद्यार्थी ऑस्ट्रेलिया तर १२ विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांत शिक्षण घेतील. पीएचडी अभ्यासक्रमातील १२ विद्यार्थ्यापैकी ९ जण ब्रिटन, २ अमेरिका तर एक नेदरलॅण्ड येथे शिक्षणासाठी जाणार आहेत.