नांदेडमध्ये दगडफेक, सहा पोलिस गंभीर जखमी; अशोक चव्हाण म्हणतात…
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये दगडफेक, सहा पोलिस गंभीर जखमी; अशोक चव्हाण म्हणतात…

नांदेड : होळी सणानिमित्त शीख समुदायाच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणुकीदरम्यान काही तरूणांनी नांदेड पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ०६ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली असून नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी होता. पोलीस प्रशासन त्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई नक्की करेल, असं म्हटलं आहे.

शीख बांधवांकडून होळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होला मोहल्ला हा कार्यक्रम केला जातो. यावेळी मात्र त्याला परवानगी देण्यात आली नव्हती. नांदेडमधील करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीदेखील काही गटांनी सोमवारी मिरवणूक काढली. यावेळी शहरात पोलिसांनी घातलेले बॅरिकेड्स देखील तोडून जमावातल्या काही जणांनी थेट पोलिसांवरच हल्ले केले. काहींनी तलवारीने देखील हल्ले केल्याचं म्हटलं जात आहे.

नांदेडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे अनेक पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच, पोलिसांनी आत्तापर्यंत सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सोमवारी हल्लाबोल मिरवणूक होळीनिमित्त काढण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांनी मिरवणूक काढू नये, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु परवानगी नसतानाही हल्लाबोलची मिरवणूक काढली.

संतप्त युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. शेवटी पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चक्क त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. यात पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात स्वत: पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, वजिय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले थोडक्यात बचावले.