मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घसरण झाली आहे. मागील वर्षभरामध्ये मोदींची लोकप्रियता तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी होण्यामागील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला आलेलं अपयश सांगण्यात येत आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा पंतप्रधान मोदींची नेता म्हणून लोकप्रियता जानेवारी २०२१ मध्ये ७३ टक्के इतकी होती. मात्र दुसऱ्या लाटेमधील केंद्र सरकारचा कारभार आणि त्यामुळे सर्वसामान्यांना झालेल्या अडचणी यामुळे मोदींची लोकप्रियता ४९ टक्क्यांनी कमी झाली आहे, असं इंडिया टुडेच्या या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.

निवडणूक प्रचार सभांमुळेच देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचं मत २७ टक्के भारतीयांनी व्यक्त केलं आहे. तर २६ टक्के लोकांनी कोरोना संदर्भातील नियमांचं पालन न केल्याने दुसरी लाट आल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर मोदी सरकारला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचं मत २०२० साली ऑगस्ट महिन्यात २३ टक्के लोकांनी व्यक्त केलं होतं. आता एका वर्षानंतर मोदी सरकारच्या कोरोनासंदर्भातील कामावर नाराज असणाऱ्यांची संख्या वाढून ४९ टक्क्यांवर गेली आहे.