नाशिक हादरलं ! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिक हादरलं ! १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक

नाशिक : नाशिकमध्ये हादरवून टाकणारी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. नराधमांनी १३ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून हे संतापजनक कृत्य केलं आहे. आठवडाभरापूर्वी सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून विधीसंघर्षित बालकासह सात जणांना अटक केली. संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यासंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे आई-वडील मजुरी करतात. ते कामावर गेले असताना ही घटना घडली. सायंकाळी ते परतल्यानंतर १३ वर्षाची मुलगी घरात दिसली नाही. पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी पीडिता भयभीत अवस्थेत आढळून आली.

आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रात्रीच संशयित दीपक खरात (१९, सिन्नर फाटा), रवि कुऱ्हाडे (१९, पांडवलेणी), आकाश गायकवाड (२४, रेल्वे मालधक्का), सुनील कोळे (२४, जेलरोड) यांना तर, पहाटे सोमनाथ खरात (१९, मालधक्का रोड, नाशिकरोड) आणि पूजा वाघ (२७) यांच्यासह एका विधीसंघर्षित मुलाला अटक केली.

संशयितांनी आठ दिवसांपूर्वी देखील पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना नाशिक न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली.