नाशिक : नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे रुग्णालयातल्या २२ रुग्णांचा ऑक्सिजन अपुरा पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नेमकी दुर्घटना घडली तेव्हा काय झालं, याविषयी राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
टोपे म्हणाले, ‘या दुर्घटनेला ऑक्सिजन लीक होणं हेच कारण ठरलं आहे. पण, त्यामध्ये देखील प्रशासन आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन काम केलं. ऑक्सिजन लिक झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात ऑक्सिजनचे व्हेपर्स झाले होते. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. तिथल्या लोकांनी तातडीने वॉल्व तोडून तो बंद केला. टाकीमध्ये उरलेला २५ टक्के ऑक्सिजन वाचवला. वेल्डिंग केली आणि पाऊण तासानंतर सगळं पुन्हा सुरू झालं, असं राजेश टोपे म्हणाले. सगळ्यांनी तत्परतेनं यात लक्ष घातलं आणि झालेलं लीकेज थांबवलं. लिक्विड ऑक्सिजन टँक पुन्हा भरला आणि पुढे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. पण ही घटना मनाला वेदना देणारी आणि दुर्दैवी आहे, असं देखील ते म्हणाले.
मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून ५ लाख आणि नाशिक महापालिकेकडून ५ लाख अशी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली आहे.