विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय
देश

विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय

मुंबई- जागतिक महामारी असलेल्या कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत. लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र हीच मर्यादा इतर कार्यक्रमांना देखील लावण्यात आली आहे. या विरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कारात किती लोकांनी सहभागी व्हावे याबाबत घालून दिलेली संख्यामर्यादा ही अन्य कार्यक्रमांसाठी सरसकट लागू केली जाऊ शकत नाही. उलट कार्यक्रम स्वरूप, कार्यक्रमस्थळाची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार लोकांना छोटय़ा- मोठय़ा कार्यक्रमांत सहभागी होण्यास परवानगी देणे योग्य होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर विवाह समारंभांत ५०, तर अंत्यसंस्कारात २० व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी आहे. सरकारच्या अधिसूचनांमध्ये मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची कमाल संख्या नमूद नाही.   केवळ लग्नसोहळे आणि अंत्यसंस्काराबाबत नमूद  आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे लग्न आणि अंत्यसंस्काराची मर्यादा अन्य मोठ्या कार्यक्रमांसाठी लागू होऊ शकत नाही, असे आम्हाला वाटत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.