राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे बातमी

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एका व्यक्तीने अर्वाच्य भाषा वापरत धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी त्यांना फोनद्वारे देण्यात आली आहे. जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा जि. सांगली) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रुपाली चाकणकर दुपारच्या सुमारास धायरी येथील कार्यालयातील दूरध्वनीवर जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीने फोन करून, “रूपाली चाकणकर कुठे आहे? मला तिचा मोबाईल नंबर हवा आहे. ती काय करते पाहून घेतो. तिचे धायरी येथील कार्यालय पेटवून देतो”, असे म्हणत अर्वाच्च भाषा वापरली. यावेळी रूपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. घडलेला प्रकार रूपाली चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रूपाली चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिला. रुपाली चाकणकर यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कार्यालयात धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पोलिस योग्य तपास करुन संबंधित व्यक्तीवर कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी या प्रकारानंतर बोलताना दिली आहे