थरार! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार
पुणे बातमी

थरार! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार

पुणे : पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची थरारक घटना आज (ता. १२) घडली आहे. तान्हाजी पवार असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने आज (ता. १२) दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून आमदार बनसोडे यांच्या दिशेनं गोळी झाडली. या गोळीबारात बनसोडे हे सुदैवाने बचावले असून, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपी तान्हाजी पवार याला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

घटनेविषयी बोलताना बनसोडे म्हणाले, अॅन्थनी म्हणून एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तीन साडेतीन वर्षांपासून तो आमच्याकडे काम करतोय. त्याचा तान्हाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझ्या पीएने फोन केला होता. मागच्या दहा दिवसांपासून त्याला फोन करतोय. दोन मुलं कामाला घे इतकंच त्याला सांगितलं होतं. बोलतानाच त्याने अरेरावी केली. तेव्हढंच झालं. त्यानंतर तो आज सकाळी आला. माझ्यासोबत त्याचं बोलणं झालं. मी त्याला विषय सोडून द्यायला सांगितलं. त्याच्या मालकालाही मी याबद्दल बोललो. दरम्यान, तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबारच केला. येताना तो पूर्वनियोजन करुनच आला असावा, कारण त्याने सोबत त्याचा साथीदार, त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल होतं, असं आमदार बनसोडे म्हणाले.