दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर पहिल्यांदाच देशात कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर पहिल्यांदाच देशात कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या खाली

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः हाहाकार केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या करोनाबाधितांच्या संख्येत तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही आता वाढ होत आहे. काल प्रथमच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत देशामध्ये ८६ हजार ४९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर देशातल्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आजही बाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. देशात काल दिवसभरात एक लाख ८२ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ३हजार ७०२ झाली आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्यूंची संख्या २,१२३ इतकी आहे. त्यामुळे देशातल्या करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता तीन लाख ५१ हजार ३०९वर पोहोचली आहे. देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. गेल्या २४ तासात देशातल्या ३३ लाख ६४ हजार ४७६ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३० लाख ३८ हजार २८९ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख २६ हजार १८७ इतकी आहे.