संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ

यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार अशी देशभर चर्चा रंगली होती. एकीकडे राजपथावर देशाचे सैनिकांची परेड तर दुसरीकडे सिल्लीच्या सीमांवर देशाचे शेतकरी आंदोलक परेड होणार होती. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर विरोध करणाऱ्या पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सर्व घडामोडींमुळे दिल्लीत कमालीचा तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या हिंसाचारात १८ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. व्हिडीओत शेतकरी पोलिसांना काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. शेतकरी आतमध्ये घुसताच पोलिसांना तेथील कठड्यावर चढून आणि नंतर भिंतीवरुन उडी मारताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी काही पोलीस कर्मचारी मात्र शेतकऱ्यांसोबत संघर्ष करत होते. हे सर्व सुरु असताना एक ट्रॅक्टर रेलिंगच्या दिशेने येऊन पोलिसांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर परेडदरम्यान शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केल्यानंतर शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी तिथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. यात जवळपास १५ फुटांच्या भिंतीवरुन उडी मारण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्यात नव्हता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एएनआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

यात जवळपास डझनहून अधिक पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान संतप्त शेतकऱ्यांच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवण्यासाठी लाल किल्ल्याच्या इमारतीवरुन उड्या मारताना दिसत आहे. शेतकरी आंदोलकांच्या या हिंसाचारात दिल्ली पोलीस दलाचे ८० कर्मचारी आणि सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. आठ बसेस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांकडून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तथापि, संयुक्त किसान मोर्चाने आपला हिंसाचाराशी काही संबंध नसल्याचं सांगत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत निमलष्करी दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत.