राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही

मुंबई : मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. यानंतर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत. पण एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी, अकरावीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्या (९१ हजार ४२०)अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ८४ हजारांनी ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशांच्या अटीतटीला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, नामवंत संस्थांमध्ये पारंपरिक किंवा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवणे कठीण होणार आहे.