उत्तर महाराष्ट् बातमी

धक्कादायक ! संशयित कोरोना रुग्णाने रुग्णवाहिकेतून मारली उडी; झाला मृत्यू

नाशिक : कोरोनाबाधिताच्या संपर्कातील एका व्यक्तीला नाशिक शहरातील नासर्डी पुलालगतच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. रुग्णवाहिकेतून त्याला महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयात नेले जाणार असतांना संबंधिताने दरवाजा उघडून पळ काढला. आपल्या मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात हृदयविकाराच्या धक्क्याने तो कोसळला. त्यास तातडीने डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या संशयित रुग्णाचा भीतीपोटी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील वडाळा नाका येथील ५५ वर्षीय व्यक्तीला समाज कल्याण विभागाच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. चार जुलै रोजी त्यास भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याचे तपासणी नमुने घेतले जाणार होते. या रुग्णास कुठलाही त्रास नव्हता. परंतु, त्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला वेगवेगळे पर्याय दिले. परंतु, त्यांनी ते नाकारले. अखेर त्यास डॉ. जाकीर हुसेन अथवा त्याच्या आवडीच्या रुग्णालयात पाठविण्यासाठी रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. रुग्णवाहिका सुरू होताच संशयित रुग्णाने दरवाजा उघडून पळ काढला. त्याचवेळी संबंधितास हृदयविकाराचा धक्का येऊन तो खाली कोसळला. दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णांसाठी काम करत आहे. परंतु, संशयित रुग्ण वा बाधित रुग्णाचा केवळ भीती अथवा घबराटीपोटी मृत्यू होणे ही बाब दुर्देवी असल्याचे मत महापालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी म्हटले आहे. कुणीही कोरोनाची भीती बाळगू नये, मात्र नियमांचे पालन करावे. कोरोना संशयित अथवा बाधित असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना हा आजार बरा होतो. आजपर्यंत मृत पावलेल्या व्यक्तींच्या निरीक्षणात भीतीपोटी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत