आगीच्या घटनांसाठी आता रुग्णालय प्रशासन जबाबदार
बातमी महाराष्ट्र

आगीच्या घटनांसाठी आता रुग्णालय प्रशासन जबाबदार

मुंबई : कोरोना काळात राज्यभरात विविध ठिकाणी रुग्णालयांत आग लागण्याच्या अनेक दुर्घटना घडल्या. यांमध्ये अनेकांचा जीव देखील गमवावा लागेल. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार या पुढील काळात अशा प्रकराच्या दुर्घटनांची जबाबदारी आता संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक देखील जारी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत. रुग्णालयाअंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामुहिक जबाबदारी राहणार आहे.

उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. १५ मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत ना हरकत प्रमाणपत्र मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडीट नियमितपणे सक्षम संस्थेमार्फत करून अग्नी सुरक्षाप्रणाली प्रमाणित करावी लागणार आहे.