सभापतींकडून अधिकाऱ्यांस जीवे मारण्याची धमकी; उदयनराजेंकडून नाराजी
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सभापतींकडून अधिकाऱ्यांस जीवे मारण्याची धमकी; उदयनराजेंकडून नाराजी

सातारा : सातारा पालिकेतील बांधकाम सभापतींनी वेळेत कामे होत नसल्याने मुख्याधिकारी व ठेकेदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिला आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रभागात कामे होत नसल्याने भाजप नगरसेविका आणि सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांना अपशब्द वापरत गळा चिरून टाकेन असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप साताऱ्यात सध्या तुफान व्हायरल होत आहे. यावर बोलताना सिद्धी पवार म्हणाल्या की, एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे. लोकांची विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला मला सामोरे जावे लागत असल्याने मला संताप अनावरण झाला असून, लोकांच्या भावनांचा उद्रेक झालेला असल्याने, मला माझ्या वक्तव्याचा अजिबात खेद नाही.

सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरून सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती आणि भाजपा नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगारास चांगले फैलावर घेतले आहे. तसेच, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ केल्याच्या ऑडिओक्लिपची सध्या साताऱ्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.