घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?
देश बातमी

घरवापसीचा प्रवास; भाजपच्या खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर?

कोलकाता : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये घरवापसीचे वारे वाहताना दिसत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसचं दार ठोठावू लागले आहेत. भाजपला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे. भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली असल्याने चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तृणमूल पुन्हा सत्तेत आल्याने निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले नेते परतीची पावलं टाकताना दिसत आहे. पूर्वाश्रमीचे तृणमूलचे नेते मुकुल रॉय हे भाजपात गेले होते. चार वर्षांनंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पुन्हा ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजपाचे खासदार शांतनु ठाकूर आणि अन्य तीन आमदार शुक्रवारी दिलीष घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते. मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी हे घडलं असल्याने चर्चांणा उधाण आले आहे.

सीएए कायदा लागू करण्यावरून खासदार शांतनु ठाकूर भाजपवर नाराज असल्याचं समोर आलं होतं. बंगालच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या मतुआ समुदायातून ठाकूर येतात. तर विश्वजित दास, अशोक कीर्तनिया आणि सुब्रत ठाकूर हे तीन आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याबद्दलही चर्चा होत आहे.