राम मंदिरासाठी दिलेले तब्बल २२ कोटींचे चेक बाऊन्स
देश बातमी

राम मंदिरासाठी दिलेले तब्बल २२ कोटींचे चेक बाऊन्स

नवी दिल्ली : अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरातून गोळा करण्यात आलेल्या देणगीतील एकूण चेक्सपैकी तब्बल १५ हजार ‘चेक बाउन्स’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बाउन्स झालेल्या चेक्सचे एकूण मूल्य २२ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राममंदिर निर्माणासाठी जवळपास पाच हजार कोटींहून अधिक निधी देणगीस्वरुपात ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ला प्राप्त झाला होता. मात्र त्यात देणगीस्वरुपात प्राप्त झालेल्या चेकपैकी २२ कोटी रुपयांचे चेक बाऊंस झाले आहेत. श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात लोकवर्गणीची मोहीम राबवण्यात आली. विश्व हिंदू परिषद आणि इतर सहयोगी संघटनांनी १५ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत देशभरातून राम मंदिरासाठी देणगी गोळा केली. ट्रस्टकडे जवळपास पाच हजार कोटींहून अधिक रक्कम देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे.

‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या लेखापरीक्षणानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देणगी देणाऱ्यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसणे, चेकवर खाडाखोड, स्वाक्षरीमध्ये तफावत अशा कारणांनी चेक बाउन्स झाले असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली. ट्रस्ट बँकांशी समन्वय साधून काम करत आहे. चेक क्लिअर करण्याबाबत चुका सुधारण्यात येतील. ज्यांचे चेक बाउन्स झाले अशा व्यक्तींना चुका सुधारण्यासाठी बँका चेक परत करतील, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले. ज्या व्यक्तींचे चेक काही कारणास्तव बाउन्स झाले अशांना चेक परत पाठवले जातील, अशी माहिती ट्रस्टचे खनिजदार स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली.