दाऊदच्या भावाने पैसे पुरविलेल्या 6 दहशतवाद्यांना अटक
देश बातमी

दाऊदच्या भावाने पैसे पुरविलेल्या 6 दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा जणांपैकी दोन जणांना पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने संयुक्तपणे कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. स्पेशल सेलचे सीपी नीरज ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईबद्दल खुलासा केला आहे. यातील पहिली अटकही महाराष्ट्रात करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून 2 जणांना दिल्ली आणि त्यानंतर उर्वरीत तिघांना यूपी एटीएससोबत कारवाई करून अटक करण्यात आली.

स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे एक महिनापासून हे ऑपरेशन सुरू होते. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या. या सहा जणांनी दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी केली होती. धक्कादायक म्हणजे, या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. हवालामार्फत या दहशतवाद्यांना पैसे पुरवण्यात आले होते, असंही ठाकूर यांनी सांगितले.