पाकिस्तानात परिस्थिती हाताबाहेर; सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर बंदी
बातमी विदेश

पाकिस्तानात परिस्थिती हाताबाहेर; सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर बंदी

लाहोर : पाकिस्तानात परिस्थिती हाताबाहेर गेली असून अंतर्गत हिंसाचारामुळे पाकिस्तानातील इम्रान सरकारने कट्टरपंथी संघटनेसमोर अक्षरश: गुडघे टेकल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील वेगाने पसरत असलेल्या व्हिडिओत पोलीस हिंसक जमावासमोर हतबल झाल्याचं दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने इम्रान सरकारने सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत देशात ट्विटर, फेसबूक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सेवा सकाळी ११ ते ३ यावेळेत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने याबाबत आदेश जारी करत ही माहिती दिली आहे. तहरीक-ए-लब्बॅक पाकिस्तान (टीएलपी) या संघटनेचे अध्यक्ष साद रिझवी याला अटक केल्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरु झाला आहे. टीएलपी गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्सच्या राजदूताला पाकिस्तानातून बाहेर काढण्याची मागणी करत निदर्शनं करत आहे. हिंसाचार पसरवल्याप्रकरणी दहशतवाद अधिनियमांतर्गत टीएलपी या संघटनेवर बंदी आणण्यात आली आहे.

लाहोर, इस्लामाबाद आणि अन्य शहरांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचा जीव गेल्याचं सांगण्यात येत आहे.