कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात अंशतः लॉकडाऊन; पालकमंत्र्यांचे संकेत
बातमी मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात अंशतः लॉकडाऊन; पालकमंत्र्यांचे संकेत

शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. एका वृत्तपत्राला त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात १,३६१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या १३१ दिवसांतील मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. यामुळे हा निर्णय घ्यावा लागेल असे पालकमंत्री शेख यांनी सांगितले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील भागांबरोबरच मुंबईतही करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज १ हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून येत असून, आरोग्य विभागासमोरील आव्हान वाढलं आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये अशंतः लॉकडाउन वा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असलेल्या मुंबईत रविवारी १,३६० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर शनिवारी १,१८८ रुग्ण आढळून आले होते. २४ तासांतच मुंबईत दोनपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर संकट उभं राहताना दिसत आहे. तर राज्यात रविवारी एका दिवसात तब्बल ११ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. रविवारचा रुग्णसंख्येचा आकडा गेल्या १४१ दिवसांमध्ये सर्वाधिक आकडा ठरला आहे.

राज्यात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या ९७,९८३ इतकी आहे. यात मुंबईत सध्या ९ हजार ३१९ सक्रीय रुग्ण आहेत. लवकरच हा आकडा देखील १० हजारांचा टप्पा ओलांडेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्याचा रुग्ण वाढीचा दर पाहता एप्रिल महिन्यापर्यंत राज्यात सक्रीय रुग्णांचा आकडा २ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना रुग्ण वाढीची माहिती बैठकीत सादर केली असून वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षाही आता अधिक रुग्ण वाढत असल्याची माहिती देण्यात आली. मगील आठवड्यात म्हणजेच सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये राज्यात ५३,५१६ नव्या रुग्णांचे निदान झाले. हाच कल कायम राहिल्यास सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या तीन दिवसांमध्ये प्रतिदिन १० हजारांपेक्षा अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.