पेट्रोल १०२ रुपयांवर; सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ
देश बातमी

पेट्रोल १०२ रुपयांवर; सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ

मुंबई : पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका संपताच अपेक्षेनुसार इंधनदरवाढीचा सपाटा सुरु झाला आहे. कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा भाव ९९.९५ रुपये इतका विक्रमी पातळीवर गेला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. तर बुधवारी पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले होते. तर गुरुवारी पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल दरात ३१ पैसे वाढ झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९७.६१ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९१.२७ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९३.१५ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.४१ रुपये झाला आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेल दरवाढ सुरूच आहे. आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.८२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८१.७३ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८६.६५ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८४.५७ रुपये प्रती लीटर झाले आहे.

सलग चार दिवस झालेल्या दरवाढीने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०२.१५ रुपये झाला आहे. तर मध्य प्रदेशातील अनुपूरमध्ये पेट्रोल १०१.८६ रुपये आहे. दुसऱ्यांदा या शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मात्र तेजी कायम आहे.कच्च्या तेलाचा भाव सात आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.अमेरिकन कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडच्या दरात ८ सेंट्सची वाढ झाली आहे. तेलाचा भाव ६८.१७ डॉलर प्रती बॅरल झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ९ सेंट्सने वधारला आहे. तो ६४.८० डॉलर प्रती बॅरल झाला.