१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!
देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत पाचवेळा पेट्रोल दरात वाढ झालेली असून, डिझेलच्या किंमती तीन वेळा वाढल्या आहेत. दिल्लीत आज पेट्रोलचा दर १००.५६ रुपेय, तर मुंबईत १०६.५९ रुपये प्रति लिटर इतका आहे. तसेच, दिल्ली डिझेलचा दर ८९.५२ रुपये व मुंबईत ९७.१८ रुपये आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी काल(ता. ०८) पेट्रोलच्या किंमतीत ३५ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ९ पैशांची प्रति लिटरमागे वाढ केली होती.

पेट्रोलची शंभरी कुठे?
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, सिक्कीम, पश्चिम बंगाल या १४ राज्यात आणि दिल्ली, लडाख, पुडुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलने शंभरी गाठलेली आहे.