पुणे महापालिका आमदारांवर मेहरबान; दिले 41 कोटींचे कंत्राट!
पुणे बातमी

पुणे महापालिका आमदारांवर मेहरबान; दिले 41 कोटींचे कंत्राट!

पुणे : पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय कामगार पुरविण्याच्या नावाखाली ठेकेदार पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याचे काम भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.’ यांना 41 कोटी रूपयांना देण्यास स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली असून सर्वांत कमी रक्कमेची निविदा आलेल्या ठेकेदाराला परवाण्याचे नूतनीकरण केले नसल्यामुळे अपात्र ठरवून भाजप आमदाराला हे काम देण्याचे स्थायी समितीने केले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या काही वर्षांपासून निविदा पद्धतीने सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम देण्यात येते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी ही निविदा संपुष्टात आल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महापालिकेत १५८० सुरक्षारक्षक ठेकेदारी पद्धतीने नेमण्यात येणार आहेत. यासाठी ही निविदा ४१ कोटींची आली. यासाठी प्रसाद लाड यांच्याशी निगडित असलेल्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीच्या निविदेला स्थायी समितीमध्ये एकमताने मान्यता देण्यात आली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने पुणेकरांचे हाल करू नये व टेंडरमध्ये भाजपचे नेतेमंडळी हस्तक्षेप करत असल्याचे आरोप पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे.

महापालिकेत सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी गृह खात्याची परवानगी आवश्यक असते. बहुउद्देशीय कामगार पुरविण्यासाठी ही परवानगी आवश्यक नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निविदा मागवीत असताना ‘सुरक्षारक्षक पुरविणे अशी निविदा न मागविता, बहुउद्देशीय कामगार पुरविणे अशी निविदा मागवली आहे.