बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेला अटक
पुणे बातमी

बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसलेला अटक

बारामती : श्री बाळू मामांचा अवतार असल्याचे सांगत २ लाख ५१ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी मनोहर मामा ऊर्फ मनोहर भोसले याला अखेर अटक करण्यात आली आहे. मनोहरला बारामती पोलीस आणि पुणे एलसीबीने अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मनोहर भोसले याला सातारा जिल्ह्यातील ‌सालपे गावातील एका फार्महाऊस वरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला बारामतीत आणण्यात आलं आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा, जादूटोणा व उच्चाटन कायदा तसंच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बारामतीतील शशिकांत सुभाष खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो, असं सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला होता. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.