पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल; नीलम गोऱ्हे यांची ग्वाही
पुणे बातमी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल; नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

पुणे : ”पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्यात. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. तसेच, सोबतचं जे आरोप करत आहेत त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी 23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या सर्व घटनाक्रमानंतर यासर्व प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे.

याबाबत नीलम गोऱ्हे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, ”पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही ऑडियो क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे लीक होणाऱ्या माहितीच्या आधारे बातमी देताना काळजी घ्या. याआधीच्या प्रकरणात अशाच लीक माहितीवर बातम्या दिल्या गेल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची उदाहरणे आहे. या प्रकरणात असं होऊ नये त्यामुळे लीक माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची वरिष्ठांकडून खातरजमा करा, असा सल्लाही माध्यम प्रतिनिधींना गोऱ्हे यांनी दिला.

पूजाचा मृत्यू संशयास्पद झालेला आहे, यात शंका नाही. परंतु, तिच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल अजून आलेला नाही. तर व्हायरल झालेल्या क्लिपचाही तपास होईल. पूर्ण तपास होईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य नाही. निःपक्षपातीपणे तपास होईल याची ग्वाही देते. तसेच संबधित व्यक्तीला मंत्रीपदापासून दूर करायचं का नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील, असे म्हणत विरोधकांच्या मागणीवर नीलम गोऱ्हे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सोबतचं जे सरकारवर आरोप करत आहे, त्यांच्यापैकी एकानेही पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याची टीका गोऱ्हे यांनी केली. उगाच कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या आहेत.