पुण्यातील एल्गार परिषदेला पोलिसांनी नाकारली परवानगी
पुणे बातमी

पुण्यातील एल्गार परिषदेला पोलिसांनी नाकारली परवानगी

पुणे : पुण्यातील एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ३१ डिसेंबरला होणाऱ्या एल्गार परिषदेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी रद्द करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडे एल्गार परिषदेने परवानगी मागितली होती. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एल्गार परिषदेला संमती देऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी केली होती. मात्र पुणे पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली आहे.

दरम्यान यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारीला कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजीही दूरदर्शन आणि सोशल मीडियावरुन इथे होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरु राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा घेऊ नयेत किंवा पुस्तकांचे स्टॉल्स लावू नयेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.