पुणे बातमी

स्वराज्य संघटनेचं चिन्ह आणि झेंड्याचा रंग कोणता? संभाजीराजेंच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट

पुणे:संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत आपल्या नव्या राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. त्यांनी ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेची स्थापना करत असल्याचे जाहीर केले. सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी आणि शिवछत्रपती आणि शाहू महाराजांचे नाव जगभरात पोहोचवण्यासाठी या पक्षाची स्थापना केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. (Sambhaji Raje Chhatrapati press conference in Pune)

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांना स्वराज्य संघटनेचं चिन्ह आणि झेंड्याचा रंग कोणता असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संभाजीराजे यांनी म्हटले की, अजून चिन्हं ठरवलं नाही, रंगही ठरलेला नाही. महाराष्ट्राचा दौरा करत जाऊ तसं लोकं सांगतील, की हे चिन्ह घ्या, हा रंग घ्या. पण रक्तात आणि हृदयातील केशरी पट्टा तर कोणी काढून घेऊ शकत नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले. संभाजीराजे यांच्या या उत्तरावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आपण सहा वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात कोणकोणती कामे केली याचा लेखाजोखा मांडला. २००७ पासून मी गोंदिया जिल्हा सोडला तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अनेक विषयांसाठी दौरे केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र पिंजून काढताना लोकं आजही शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम का करतात, हे मला समजले. त्यामधून मला खूप मोठी उर्जा मिळाली. हीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आली. त्यांनी मला बोलावून राष्ट्रपतीनियुक्त खासदारकी स्वीकारण्याची विनंती केली.

या पदाची प्रतिष्ठा वेगळी असते. त्यामुळे मी हे पद स्वीकारलं. मी पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांना भेटलो तेव्हा त्यांना राजर्षी शाहू महाराजांचे पुस्तक भेट दिले होते. त्यावर मी अभिप्राय लिहला होता. तो अभ्रिपाय मी पंतप्रधान मोदींना वाचायला लावला. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालेन, असे त्यामध्ये म्हटले होते. त्यानुसार मी खासदारकीच्या सहा वर्षांमध्ये राजकारणविरहीत काम केले, समाजाला दिशा देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले, याचा मला अभिमान असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published.