महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास; पुण्यात किती तारखेला पावसाचा अंदाज? जाणून घ्या
पुणे बातमी

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास; पुण्यात किती तारखेला पावसाचा अंदाज? जाणून घ्या

पुणे : राज्यभरात यंदा दमदार हजेरी लावल्यानंतर लवकरच मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी पुण्यासह महाराष्ट्रातून मान्सून परतेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान ३१ डिग्री सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘गेल्या काही दिवसांत राज्यातील आर्द्रता लक्षणीयरीत्या कमी झाली असल्याने सोमवारी आणि मंगळवारी पावसाची शक्यता धूसर आहे,’ असं पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ६ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मात्र शहरातील तुरळक ठिकाणी १५.५ मिमी ते ६४.४ मिमीपर्यंत पाऊस कोसळेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती?

येत्या आठवड्यात ५ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत ३२ ते ३३ अंशांच्या आसपास कमाल तापमान राहील. या काळात ढगाळ वातावरण, हलका पाऊस किंवा शिडकाव्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची जाणीवही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात गुरुवारनंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.